श्रीरामपूर वेब प्रतिनिधी – श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन व अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या पथकाने अवैध वाळू उपशाविरोधात मोठी संयुक्त कारवाई करत दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये सुमारे ₹9 लाख 25 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी संबंधित चालक व मालकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.पहिल्या घटनेत, मांडवगाव परिसरात पहाटे सुमारे ६.३० वाजण्याच्या सुमारास टाटा कंपनीचा लाल-पिवळ्या रंगाचा टिपर (MH 17 CV 1095) वाळूची अवैध वाहतूक करताना आढळून आला. पोलिसांनी वाहन थांबवून तपासणी केली असता त्यामध्ये अंदाजे दोन ब्रास वाळू आढळून आली. या कारवाईत ₹7,15,000 किमतीचा टिपर व वाळू असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी चालक सुनील छगन रजपूत व मालक सागर भाऊसाहेब आरसे (रा. मांडवगाव, ता. श्रीरामपूर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दुसऱ्या घटनेत, मांडवगाव येथील खंडोबा मंदिराजवळील रस्त्यावर सकाळी सुमारे ९.३० वाजता स्वराज कंपनीचा विनानंबर ट्रॅक्टर व ट्रॉली वाळूची अवैध वाहतूक करताना पोलिसांच्या पथकाने पकडला. तपासणीदरम्यान ट्रॉलीत वाळू भरलेली आढळून आली. या कारवाईत ₹2,10,000 किमतीचा ट्रॅक्टर, ट्रॉली व वाळू असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी चालक सागर कासारी शेरात व मालक युवराज अशोक धनवडे (रा. पुणतांबा) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दोन्ही प्रकरणांत आरोपींविरोधात भा.न्या.सं. 303(2) तसेच पर्यावरण संरक्षण अधिनियम कलम 3/15 अन्वये गुन्हे नोंदवण्यात आले असून पुढील तपास श्रीरामपूर तालुका पोलीस करीत आहेत.