मिरजगाव व खर्डा हद्दीत अवैध वाळू उपशावर गुन्हे शाखेचा धडक कारवाईचा बडगा

अहिल्यानगर वेब प्रतिनिधी –
मिरजगाव व खर्डा पोलीस ठाणे हद्दीत अवैध वाळू उपसा व वाहतूक करणाऱ्यांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करत चार आरोपींना ताब्यात घेत दोन जेसीबी, चार ट्रॅक्टर-ट्रॉली व मोठ्या प्रमाणात वाळू असा तब्बल ८२ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार करण्यात आली.
पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनिरीक्षक समीर अभंग व त्यांच्या पथकाने २० जानेवारी रोजी मिरजगाव हद्दीत नागापूर शिवारातील नदीपात्रात छापा टाकला. यावेळी दोन जेसीबीच्या साहाय्याने तीन ट्रॅक्टरमध्ये बेकायदेशीर वाळू भरताना आढळून आले. पोलिसांची चाहूल लागताच काहीजण पळून गेले. मात्र, संदीप जाधव (रा. खडकत, जि. बीड), नितीन कापरे (रा. नागलवाडी, ता. कर्जत), अलम शेख (मूळ रा. उत्तर प्रदेश, सध्या नागलवाडी) यांना ताब्यात घेण्यात आले.
याठिकाणी ५० लाखांचे दोन जेसीबी, २४ लाखांचे तीन ट्रॅक्टर-ट्रॉली व ३ ब्रास वाळू असा एकूण ७४.३० लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. या प्रकरणी मिरजगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.
दरम्यान, २१ जानेवारी रोजी पहाटे खर्डा हद्दीत खर्डा–भूम रस्त्यावर सापळा रचून वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर अडवण्यात आला. चालक योगेश सुरवसे (रा. खर्डा, ता. जामखेड) याला ताब्यात घेऊन ८ लाखांचा ट्रॅक्टर-ट्रॉली व १ ब्रास वाळू असा ८.१० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी खर्डा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या दोन दिवसांच्या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेने एकूण ८२.४० लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. अवैध वाळू उपसा व वाहतुकीविरोधात पुढेही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *