राहुरी वेब प्रतिनिधी, शरद पाचारणे –
समाजातील शांतता, सुरक्षितता आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या राहुरी पोलिसांच्या उल्लेखनीय कामगिरीचा क्रांतीसेना व प्रहार संघटनेच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला. ‘ऑपरेशन मुस्कान’ अंतर्गत अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलींचा शोध घेण्यात महत्त्वपूर्ण योगदान देणारे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे व राहुरी पोलीस ठाण्यातील अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला.
यावेळी पारंपरिक शाल-श्रीफळाऐवजी बाळासाहेब भोर लिखित ‘प्रवरेच्या काठावरून’ या काव्यसंग्रहाची पुस्तके भेट देत अभिनव पद्धतीने सन्मान करण्यात आला. गेल्या नऊ वर्षांत विविध प्रकरणांत अपहरण झालेल्या जवळपास १०० अल्पवयीन मुलींचा मागील दोन वर्षांत शोध घेऊन त्यांना सुरक्षिततेचा आधार देण्यात पोलिसांना यश आले आहे. तसेच, देशातील विविध रेल्वे स्थानकांवरून अपहरण करून वेठबिगारीत ठेवण्यात आलेल्या २३ महिला-पुरुषांची सुटका करून गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली. ही कामगिरी पोलिसांच्या कार्यक्षमतेचे आणि संवेदनशीलतेचे ठळक उदाहरण ठरली आहे.
या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे व जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या वतीनेही यापूर्वी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले होते. त्याच अनुषंगाने क्रांतीसेना व प्रहारच्या वतीने राहुरी पोलीस ठाण्यातील अधिकारी-कर्मचाऱ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
या वेळी प्रहारचे तालुकाध्यक्ष सुरेशराव लांबे, क्रांतीसेनेचे संपर्क प्रमुख मधुकर म्हसे, सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब पवार, सुरेश म्हसे, ज्ञानेश्वर पवार, पोलीस उपनिरीक्षक समाधान फडोळ, सहायक फौजदार तुळशीदास गिते, अशोक शिंदे, पोहेकॉ. विकास साळवे,जालिंदर साखरे, संदीप ठाणगे, गणेश सानप, पोकॉ. अजिनाथ पाखरे, प्रमोद ढाकणे यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.