राहुरी वेब प्रतिनिधी, शरद पाचारणे –
राहुरी तालुक्यातील चिंचोली येथील नंदादीप लॉजिंगमध्ये सुरू असलेल्या कुंटणखान्यावर श्रीरामपूर अप्पर पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या पथकाने छापा टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईत एका महिलेची सुटका करण्यात आली असून लॉजिंगचा मॅनेजर व चालक मालक अशा दोघांना अटक करण्यात आली आहे.
अप्पर पोलिस अधीक्षक श्रीरामपूर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, राहुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत चिंचोली गावच्या शिवारात असलेल्या नंदादीप लॉजिंगमध्ये हॉटेल मॅनेजर आणि मालक स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी महिलांना पैशाचे आमिष दाखवून वेश्याव्यवसायास प्रवृत्त करीत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली बनावट ग्राहक पाठवून खातरजमा करण्यात आली.
माहिती खरी ठरताच पंचांसह पथकाने लॉजिंगवर छापा टाकला. तपासादरम्यान वरच्या मजल्यावरील खोलीत एक महिला मिळून आली. तिची विचारपूस केली असता, हॉटेल मालक व मॅनेजर यांच्या मध्यस्थीने ग्राहकांकडून पैसे घेऊन वेश्याव्यवसाय करून घेतला जात असल्याचे तिने सांगितले. पोलिसांनी तत्काळ तिची सुटका केली.
या प्रकरणी हॉटेल मॅनेजर अमोल रामचरण अहिरवार (वय २९, रा. नंदादीप, चिंचोली, ता. राहुरी, मूळ रा. दमोह, मध्यप्रदेश) व अज्ञात चालक मालक यांच्याविरुद्ध राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मानवी तस्करी प्रतिबंधक कायदा १९५६ अंतर्गत कलम ३, ४, ५ प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक संजय ठेंगे करीत आहेत.सदरची कारवाई ही मा.श्री. सोमनाथ घार्गे साो, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर, श्री. सोमनाथ वाघचौरे, अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपुर, श्री. जयदत्त भवर, उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपुर यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि. संजय ठेंगे, सपोनि सुदाम शिरसाठ, अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपुर कार्यालयातील पोसई/ चारुदत्त खोंडे, पो.हे.कॉ. दादासाहेब लोंढे, पो.ना. संदीप दरंदले, पो.कॉ. सतिष पठारे, पो.कॉ. सहदेव चव्हाण तसेच राहुरी पो.स्टे.चे पोहेकॉ एस.बी. आवारे, मपोकॉ वंदना पवार यांनी केली आहे.