वांबोरी चारिचे आवर्तन तातडीने सुरू करा – माजी मंत्री प्राजक्त तनपुरे

राहुरी वेब प्रतिनिधी (शरद पाचारणे) –

यंदाच्या जोरदार पावसामुळे मुळा धरण पूर्ण क्षमतेने भरले असून, धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. मात्र राहुरी, पाथर्डी व नगर तालुक्यातील अवकाळी प्रवाह व पाझर तलावांवर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना अद्याप वांबोरी चारिचे पाणी मिळालेले नाही. त्यामुळे खरीप हंगामातील पिके धोक्यात आली असून, चारिचे आवर्तन तातडीने सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. वांबोरी चारिच्या लाभक्षेत्रातील अनेक गावांमध्ये भात, ऊस तसेच कडधान्य व चारा पिकांची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात आली आहे. या पिकांना तातडीने पाण्याची गरज असताना अद्याप आवर्तन सुरू न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र अस्वस्थता आहे. चारिचे आवर्तन सुरू झाल्यास या पाण्याचा थेट फायदा शेतकऱ्यांना होणार असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.यासंदर्भात माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी अहिल्यानगर येथील मुळा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन देत, सर्व बाबींचा विचार करून वाबोरी चारिचे आवर्तन तातडीने सुरू करण्याची मागणी केली आहे.जर लवकरात लवकर निर्णय घेतला गेला नाही, तर पिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात असून, प्रशासनाने त्वरित हालचाली कराव्यात, अशी जोरदार मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *