शिवांकुर ग्रुपच्या सर्व शाळांचे संयुक्त स्नेहसंमेलन उत्साहात

राहुरी वेब प्रतिनिधी ,१९ ( शरद पाचारणे ) :
शिव प्रतिष्ठान संचलित शिवांकुर विद्यालय कोंढवड, शिवांकुर रेनबो स्कूल राहुरी व शिवांकुर विस्डम खडांबे यांच्या संयुक्त वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ कोंढवड येथील मुख्य शाखेत मोठ्या उत्साहात पार पडला.
स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीचे औचित्य साधून आयोजित या कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सांस्कृतिक प्रगतीचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सेवानिवृत्त गटविकास अधिकारी श्री. विनायक गुळवे यांनी, “या विद्यालयातून संस्कारक्षम विद्यार्थी घडत असून शिवांकुर विद्यालयाचे रोपटे आज वटवृक्षात रूपांतरित झाले आहे,” असे गौरवोद्गार काढले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सा.फु.मा. विद्यालयाचे सेवानिवृत्त प्राध्यापक गोरक्षनाथ औटीसर होते.
प्रास्ताविक मुख्याध्यापिका छाया जाधव यांनी केले. त्यांनी वर्षभरातील विविध उपक्रम, शालेय व शाळाबाह्य स्पर्धांमधील यशाची माहिती दिली. वर्षभरात विविध स्पर्धांत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.
विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली. मोबाईलचा अतिवापर, मुलींवरील अत्याचार, तसेच मुलींचे शिक्षण या सामाजिक विषयांवर आधारित नाट्यप्रयोग व नृत्यप्रस्तुती विशेष ठरल्या.
कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब पवार, उपाध्यक्ष गणेश शेळके, विश्वस्त डॉ. नरेंद्र इंगळे, मंगलाताई पवार, डॉ. गौरी पवार, शिल्पा इंगळे, ज्योती शेळके, सचिव डॉ. प्रकाश पवार यांच्यासह सुभाष मगर, सुवर्णा गुळवे, हिराताई काकडे आदी मान्यवर उपस्थित होते.
सूत्रसंचालन विजय शिंदे व सुरेखा मकासरे यांनी केले. आभार सुजाता तारडे यांनी मानले. यावेळी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *