राहुरी वेब प्रतिनिधी (शरद पाचारणे) : देवळाली प्रवरा येथे माजी नगराध्यक्ष सत्यजित चंद्रशेखर कदम यांच्यावर प्राणघातक हल्ला प्रकरणातील आठ महिन्यांपासून फरार असलेला आरोपी राहुरी पोलिस पथकाने ताब्यात घेतला आहे.
देवळाली प्रवरा येथे दि. २६ मार्च २०२५ रोजी काही इसमांनी गैरकायद्याची मंडळी जमवून कटकारस्थान रचत माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ३७७/२०२५ अन्वये बी.एन.एस. कलम १०९, ६१(१), ११९(१), १८९(२), १९१(३), १९० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्यातील पाहिजे आरोपी खंड्या उर्फ विजय बाळू इथापे (रा. देवळाली प्रवरा) हा गेल्या आठ महिन्यांपासून फरार होता. पोलिस उपनिरीक्षक राजू जाधव यांच्या नेतृत्वाखालील पथकाने गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीनुसार तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सापळा रचून आरोपीस ताब्यात घेतले. त्यास अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलिस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, उपविभागीय पोलिस अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव, पोहेकॉ राहुल यादव, पोका गणेश लिपने, पोका सचिन ताजने, पोना प्रवीण अहिरे, पोना रोकडे सहभागी होते.
या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव व पोलीस कॉन्स्टेबल गणेश लिपने करीत आहेत.