समर्थ मुलं घडविण्यासाठी पालक,शिक्षक,समाज एकत्र यायला हवा – प्रसिद्ध व्याख्याते गणेश शिंदे

राहुरी  :- महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त सुप्रसिद्ध व्याख्याते गणेश शिंदे यांनी विद्यार्थी, पालक व  शिक्षकांना जीवनदृष्टी देणारे, मनाला भिडणारे आणि विचारांना दिशा देणारे प्रेरणादायी मार्गदर्शन केले.

विद्यार्थी घडविताना केवळ अभ्यास नव्हे तर विद्यार्थ्यांचे सर्वांगीण व्यक्तिमत्व घडवण्यासाठी शिक्षकांबरोबरच पालक व समाजाचाही सहभाग आणि भूमिका महत्त्वाची आहे. पालकांनी मुलांना समजून घेत मार्गदर्शक मित्र व्हावे,

“मुलं म्हणजे ओल्या मातीसारखी असतात. पालक आणि शिक्षकांच्या शब्दांचा, वागणुकीचा ठसा त्यांच्या आयुष्यावर कायमचा उमटत असतो. त्यामुळे सूचना देताना हुकूमशाही नव्हे तर समजूतदार संवाद हवा.

विद्यार्थ्यांनी आत्मविश्वास, सातत्य आणि स्वतःवर विश्वास ठेवून जीवनात पुढे जाण्याचा मंत्र त्यांनी दिला. 

अपयश हे थांबण्याचे नव्हे तर नव्याने उभे राहण्याचे पाऊल असल्याचे त्यांनी प्रभावी उदाहरणांतून पटवून दिले. लाथ मारील तिथे पाणी काढील ही वृत्ती विद्यार्थ्यांनी अंगिकारणे गरजेचे आहे.

पालकांना उद्देशून बोलताना त्यांनी सांगितले की,

“मुलांच्या यशामागे पालकांचा संयम, विश्वास आणि सकारात्मक संवाद ही खरी शक्ती असते.”

 या प्रभावी व्याख्यानाने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास , पालकांच्या मनात समाधान आणि शिक्षकांच्या विचारांना नवी दिशा मिळाल्याचे चित्र दिसून आले. श्री गणेश शिंदे यांनी  शेवटी संपूर्ण महाराष्ट्रात सुप्रसिद्ध असलेली त्यांची काय सांगू राणी गाव सुटेना..ही कविता सादर केली आणि उपस्थितांची  मने जिंकली.

सावित्रीबाई फुले प्राथमिक, माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयांचा संयुक्त वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व  मोठ्या उत्साहात साजरा झाला . यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सावित्रीबाई फुले शिक्षण मंडळाचे अध्यक्ष तसेच महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू  डॉ.विलास खर्चे यांनी विद्यालयात राबवित असलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांचे कौतुक करून विद्यालयाच्या भावी उज्ज्वल वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या

व पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांचे कौतुक करून अभिनंदन केले.  तसेच विद्यालयाची प्रगती आणि विदयार्थीभिमुख उपक्रमांसाठी आर्थिक मदत करण्याची ग्वाही देखील दिली.

 यवतमाळ जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी तसेच विदयालयाचे माजी विद्यार्थी  संतोष धोत्रे यांनी देखील विद्यालयात काळानुरूप झालेल्या बदलांचे मनःपूर्वक कौतुक करून विदयालयातील ग्रंथालय अद्ययावतीकरणासाठी माजी विद्यार्थांकडून दोन लाख रुपयांची भरीव मदत देण्याचे जाहीर केले .  संस्थेचे सचिव डॉ . महानंद माने यांनी  विद्यालयाची गुणवत्तावाढ व भविष्यात अधिकाधिक नाविन्यपूर्ण सुविधा उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली.

त्याचप्रमाणे सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य अरुण तुपविहीरे ,प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक. बाळासाहेब खेत्री ,इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका योगिता आठरे , उपमुख्याध्यापक  बाळासाहेब डोंगरे ,पर्यवेक्षक मनोज बावा उपस्थित होते. अध्यापक प्रतिनिधी संतोष जाधव,  गोरक्ष उचाळे, अनिता वाघमारे तसेच शिक्षकेतर प्रतिनिधी भानुदास आढाव ,गोरक्षनाथ वर्पे,  उपस्थित होते . कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून प्रा .जितेंद्र मेटकर यांनी विद्यालयाच्या सर्वांगीण प्रगतीचा आढावा घेतला व पाहुण्यांचा परिचय करून दिला .  यानंतर वर्षभरातील शालेय उपक्रम तसेच विविध स्तरावरील विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे बक्षीस देऊन कौतुक करण्यात आले. तसेच सावित्रीबाई फुले शिक्षण मंडळातर्फे दिले जाणारे मानाचे सावित्रीकन्या, सावित्रीपुत्र, विद्यार्थीप्रिय शिक्षक – शिक्षिका, गरीब होतकरु विद्यार्थी, उत्कृष्ट खेळाडू, निसर्गप्रेमी विद्यार्थी, एनसीसी उत्कृष्ट छात्र – छात्रा  तसेच उत्कृष्ट गुणवंत विद्यार्थी आदी पुरस्कार देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेखा टेमकर व श्री. संदीप कुंभारे  यांनी करून कार्यक्रमाची धुरा सांभाळली. कार्यक्रमाचे आभार गोरक्ष उचाळे यांनी मानले.यावेळी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व पालक – विद्यार्थी उपस्थित होते. हा कार्यक्रम मोठ्या उत्साहापूर्ण वातावरणात संपन्न झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *