राहुरीतील तिरुपती महिला ग्रुपला तिरुपती बालाजी देवस्थानात आठ दिवस सेवा करण्याची संधी

राहुरी वेब प्रतिनिधी (शरद पाचारणे)१६ सप्टेंबर : राहुरी येथील तिरुपती महिला ग्रुपला जागतिक प्रसिद्ध श्री तिरुपती बालाजी व्यंकटेश देवस्थानात सेवा करण्याची विशेष संधी मिळाली आहे. देशभरातून हजारो भाविक या सेवेसाठी प्रयत्न करत असतात, मात्र अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतरही त्यांना ही संधी मिळत नाही. अशा परिस्थितीत राहुरीच्या या महिला ग्रुपने अथक प्रयत्न करून बालाजी मंदिरात एक आठवडा सेवा करण्याचा मान मिळवला आहे.

या महिला ग्रुपला फक्त एक आठवडा सेवाच नव्हे, तर मंदिराच्या गाभाऱ्यात सलग दोन दिवस, प्रत्येकी सहा तास सेवा करण्याची दुर्मिळ संधी मिळाली. यामुळे त्यांचा आनंद द्विगुणीत झाला आहे. राहुरीतून बालाजीच्या सेवेसाठी निवड झालेला हा पहिलाच महिला ग्रुप असल्याने त्यांचे विशेष कौतुक होत आहे.

या सेवेसाठी मनीषा भुजबळ यांनी विशेष प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांमुळेच हा ग्रुप तयार झाला आणि महिलांना ही दुर्मिळ संधी मिळाली. देवस्थानतर्फे या महिलांच्या राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती.

या ग्रुपमध्ये सुनंदा परदेशी, हेमलता तनपुरे, नलिनी तनपुरे, जयश्री तनपुरे, संगीता पाटील, देवयानी तनपुरे, शीतल कासार, मंदा औटी, सुरेखा माकोने आणि इंदुबाई जाधव यांचा समावेश आहे. मनीषा भुजबळ यांनी या महिलांचा ग्रुप तयार करून त्यांना ही संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल सर्वांनी त्यांचे विशेष कौतुक केले आहे.
या महिलांची राहण्याची व भोजनाची व्यवस्था देवस्थान तर्फे करण्यात आली आहे. तिरुपती महिला ग्रुपने भक्तिभावाने सेवा करताना अनुभवलेला आनंद शब्दांत व्यक्त करता येणार नाही, असे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *