राहुरी वेब प्रतिनिधी, (शरद पाचारणे )११ ऑगस्ट : जैन धर्मानुसार अत्यंत कठीण मानली जाणारी ‘मासखमण’ (31 उपवास) तपस्या राहुरी येथे चि. मोहित संतोषकुमार लोढा यांनी यशस्वीपणे पूर्ण केली आहे. विशेष म्हणजे, अवघ्या 25 वर्षांच्या मोहितने यापूर्वी 2022 मध्ये आणि आता 2025 मध्ये अशा दोन वेळा ही कठोर तपस्या करून एक नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. त्यांच्या 31 उपवासांची पचकावणी शनिवार, 9 ऑगस्ट 2025 रोजी जैन स्थानक राहुरी येथे संपन्न झाली.जैन धर्मात तपस्येला विशेष महत्त्व आहे. ‘मासखमण’ या कठोर उपवासात साधकाला 31 दिवस केवळ गरम पाणी पिण्याची परवानगी असते, तेही फक्त सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत. अशा प्रकारची तपस्या करणे अत्यंत कठीण मानले जाते. मोहित लोढा यांनी हे व्रत पूर्ण करून समाजात एक आदर्श निर्माण केला आहे.राहुरी येथील जैन स्थानकात प. पू. अर्चनाजी महाराज साहेब यांच्यासह एकूण पाच महाराज साहेबांचा चातुर्मास सुरू आहे. याच चातुर्मासात मोहितने हे तप केले. त्यांच्या पचकावणी कार्यक्रमावेळी परमपूज्य अर्चनाजी महाराज साहेब यांनी उपस्थित सर्वांना आपल्या व्याख्यानातून मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित होते. यात मा. खासदार प्रसाद तनपुरे, डॉ. बाबूराव बापूजी तनपुरे साखर कारखान्याचे चेअरमन आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे, राहुरीच्या माजी नगराध्यक्षा सौ. उषाताई तनपुरे, पोलीस निरीक्षक संजय ठेंगे साहेब, राहुरी शहर व्यापारी कोअर कमिटीचे पदाधिकारी आणि राहुरी तालुक्यातील जैन समाजातील बंधू-भगिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.कार्यक्रमात संतोषकुमार लोढा, प्रमोद कोटेचा, उषा कर्णावट, पारस चोरडिया, प्रचिती लोढा, संजय ठेंगे साहेब, उषाताई तनपुरे आणि ललित चोरडिया यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल सुराणा यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी राहुरी जैन श्रावक संघाने विशेष परिश्रम घेतले.