लाख येथे धाडसी चोरी: दीड तोळे सोने आणि रोख पंचवीस हजार लंपास

राहुरी वेब प्रतिनिधी,०६(शरद पाचारणे ):-
राहुरी तालुक्यातील लाख गावातून एक धक्कादायक चोरीची घटना समोर आली आहे. नेवासा तालुक्यातील उस्थळ दुमला येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेले व  राहुरी तालुक्यातील लाख येथील रहिवाशी सुनील बापूसाहेब निमसे यांच्या घरी भरदिवसा ही धाडसी चोरी झाली आहे. या घटनेत दीड तोळ्याचे सोन्याचे मनी गंठण (अंदाजे किंमत 30,000 रुपये) आणि 25,000 रुपये रोख रक्कम असा एकूण 75,000 रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे.

याबाबत सुनील बापूसाहेब निमसे यांनी राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार, त्यांच्या आई प्रमिला यांनी अंदाजे दीड तोळ्याचे सोन्याचे मनी गंठण भांड्यांच्या मांडणीतील जेवणाच्या दोन ताळी  स्टीलच्या डब्यांपैकी वरच्या डब्यात ठेवले होते. तसेच, खालच्या डब्यात कामगारांना पगार देण्यासाठी 25,000 रुपये रोख रक्कम ठेवली होती.

शनिवार, 5 जुलै 2025 रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास सुनील निमसे घर बंद न करताच श्रीरामपूरला गेले होते. श्रीरामपूरहून परत येत असताना त्यांना बेलापूरमधील त्यांच्या गावातील पोलीस पाटील महेश आनंदे यांचा फोन आला की, त्यांच्या घरी चोरी झाली आहे आणि त्यांनी तातडीने यावे.

घरी परतल्यानंतर सुनील निमसे यांनी आईकडे विचारणा केली असता, प्रमिला यांनी सांगितले की, शुक्रवार, 4 जुलै 2025 रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास त्यांनी त्यांच्याकडील टोळीतील कामाचा पगार 25,000 रुपये पाहिले होते. त्यानंतर, शनिवार, 5 जुलै रोजी सायंकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास वैभव खाडे त्यांचे पैसे घेण्यासाठी निमसे यांच्या घरी आला होता. त्यावेळी प्रमिला निमसे यांनी मांडणीवर ठेवलेल्या डब्यातून पैसे देण्यासाठी पाहिलं असता, त्या डब्यात पैसे नव्हते. त्यांनी त्या डब्याच्या खालचा डबा उघडून पाहिला असता, त्यातील त्यांचे दीड तोळ्याचे सोन्याचे मनी गंठणही तिथे नव्हते. प्रमिला निमसे यांनी घरात शोध घेतला असता, चोरीला गेलेला ऐवज मिळून आला नाही. यावरून त्यांची खात्री झाली की, अज्ञात भामट्याने त्यांच्या घरातील मांडणीवरील डब्यात ठेवलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली आहे.

सुनील बापूसाहेब निमसे यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *