बेकायदा खताचा साठा जप्त ; एकाविरुद्ध गुन्हा दाखल

राहुरी वेब प्रतिनिधी ,११( शरद पाचारणे ):-
११ जून, २०२५ रोजी, राहुरी तालुक्यातील पाथरे खु. येथे, कृषी विभागाने केलेल्या कारवाईत मोठ्या प्रमाणात बनावट खतांचा साठा जप्त केला. या प्रकरणी संदीप यमाजी जाधव रा .पाथरे खु. यांच्याविरुद्ध अत्यावश्यक वस्तू अधिनियम, १९५५ आणि रासायनिक खते (नियंत्रण) आदेश, १९८५ तसेच भारतीय न्याय संहिता, २०२३ अंतर्गत विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अहिल्यानगर येथील खत निरीक्षक तथा जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक राहुल बाळासाहेब ढगे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांना १० जून, २०२५ रोजी गुप्त माहिती मिळाली की, पाथरे खु. येथील चैतन्य हार्डवेअर  ( वळण रोड , पाथरे खु.) मध्ये विनापरवाना खतांचा साठा असून त्यांची विक्री केली जात आहे.
या गुप्त माहितीच्या आधारे,  राहुल ढगे यांनी राहुरी तालुका कृषी अधिकारी  बापूसाहेब अण्णासाहेब शिंदे आणि कृषी अधिकारी गणेश नारायण अनारसे यांच्या पथकासह चैतन्य हार्डवेअर, वळण रोड, पाथरे खु., तालुका राहुरी, जिल्हा अहिल्यानगर येथील गोदामावर छापा टाकला.
पंचनामा करताना, गोदामात विक्रीसाठी ठेवलेल्या ५० किलोच्या गोण्या, १० किलोच्या बादलीतील खते आणि १ लिटरमधील द्रव खते मोठ्या प्रमाणात आढळून आली.  संदीप यमाजी जाधव (वय ४२, रा. पाथरे खु., ता. राहुरी, जि. अहिल्यानगर,) यांची चौकशी केली असता, त्यांच्याकडे खते विक्री आणि साठवणुकीचा कोणताही परवाना नसल्याचे समोर आले.  तसेच त्यांनी खत खरेदीची बिले किंवा साठा नोंदवही (पुस्तक) यासारखी कोणतीही आवश्यक कागदपत्रे सादर केली नाहीत.
या कारवाईत एकूण रु. ७,४९,७३०/- किमतीचा खतांचा साठा जप्त करण्यात आला, ज्यात विविध प्रकारच्या कृषी उत्पादनांचा समावेश आहे:
कृषी समृद्धी ७८ पावडर (५० किलो, ७५ गोणी) – रु. ४१,२५०/-
कृषी समृद्धी ७८ पावडर (५० किलो, ६५ गोणी) – रु. ४८,७५०/-
पोटॅश दाणेदार बायोफर्टिलायझर (५० किलो, ४२ गोणी) – रु. ४४,१००/-
किसान कॉटन आणि मका स्पेशल ऑरगॅनिक खत (५० किलो, ५२ गोणी) – रु. ५४,६००/-
ट्रायकोन ऑर्बिट (१० किलो, ४८ बकेट) – रु. ४६,०८०/-
सुपर बुस्टर (१ लिटर, ६ बॉटल) – रु. ५,१००/-
रुद्र पॉवर (१ लिटर, ४९५ बॉटल) – रु. ५,०९,८५०/-
 संदीप यमाजी जाधव यांनी विनापरवाना आणि नियमबाह्य पद्धतीने खतांचा साठा करून त्यांची विक्री केल्याचे निष्पन्न झाले आहे.  त्यामुळे, त्यांना विक्री बंद करण्याचे आदेश बजावण्यात आले असून हा साठा इतरत्र हलवू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
पुढील तपास राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी पोलीस करत आहेत .  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *