ट्रॅक्टरचा फोटो काढल्याच्या कारणावरून गुहा येथे रवींद्र काकडे यांच्या कुटुंबीयांना मारहाण; जिवे मारण्याची धमकी

राहुरी वेब प्रतिनिधी,( शरद पाचारणे ) : राहुरी तालुक्यातील गुहा येथे ट्रॅक्टरचा फोटो काढल्याच्या क्षुल्लक कारणावरून एकाच कुटुंबातील दहा जणांच्या टोळक्याने रविंद्र काकडे आणि त्यांच्या कुटुंबीयांना शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच त्यांना जिवे मारण्याची धमकीही दिली. याप्रकरणी रविंद्र ज्ञानदेव काकडे (वय ४४ वर्षे, धंदा-शेती, रा. गुहा) यांनी राहुरी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली आहे.फिर्यादी रविंद्र काकडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ते त्यांच्या कुटुंबासोबत गुहा येथे राहतात आणि शेती व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करतात. त्यांच्या शेजारी कैलास भिवसेन सौदागर हे त्यांच्या कुटुंबासह राहतात.दिनांक १ जून २०२५ रोजी कैलास सौदागर यांच्या शेतात ट्रॅक्टरचे काम चालू असताना फिर्यादीचे भाऊ जालिंदर यांनी त्याचे फोटो काढले होते. त्याच दिवशी सायंकाळी सुमारे ६:३० वाजता फिर्यादी रविंद्र काकडे त्यांच्या घरासमोर उभे असताना विकास बापु सौदागर, मंदाबाई कैलास सौदागर, दिलीप बापु सौदागर, प्रणव बाबासाहेब सौदागर, सार्थक विकास सौदागर, सोपान दादा सौदागर, कृष्णा सोपान सौदागर, विलास भिवसेन सौदागर, संभाजी सोन्याबापु सौदागर आणि शाम बाळासाहेब सौदागर (सर्व रा. गुहा) हे तिथे आले.त्यांनी रविंद्र यांना विचारले की, ‘तुमच्या भावाने ट्रॅक्टरचा फोटो का काढला?’ यावर रविंद्र यांनी ‘फक्त फोटोच काढला आहे, दुसरे काही नाही’ असे उत्तर दिले. याचा राग आल्याने आरोपींनी त्यांना घाणघाण शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तसेच रविंद्र यांची आई लिलाबाई आणि भाऊ जालिंदर यांनाही शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी मारहाण केली.फिर्यादीनुसार, विकास सौदागर याने लोखंडी गजाने रविंद्र यांच्या डाव्या हाताच्या मनगटावर मारले, तर दिलीप सौदागर आणि विलास सौदागर यांनी लाकडी दांडक्याने मारहाण केली. आरोपींनी त्यांना पुन्हा त्रास दिल्यास जिवे ठार मारण्याची धमकीही दिली.रविंद्र काकडे यांनी दाखल केलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की, ट्रॅक्टरचा फोटो काढल्याच्या कारणावरून आरोपींनी गैरकायदेशीर मंडळी जमवून त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना मारहाण केली व धमकी दिली. त्यांनी आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.राहुरी पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक प्रविण बागुल करत आहेत.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *