शब्दगंधचा कॉ.गोविंदभाई पानसरे स्मृती प्रबोधन पुरस्कार डॉ.सुनीलकुमार सरनाईक यांना जाहीर

अहिल्यानगर,२३ (शरद पाचारणे )- शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने तत्कालीन मार्गदर्शक कॉ.गोविंदभाई पानसरे यांच्या नावाने दरवर्षी त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त पुरस्कार देण्यात येतो, यावर्षी फेब्रुवारी महिन्यातच शब्दगंध साहित्य संमेलन असल्याने हा पुरस्कार संमेलनात देण्याबाबतचा निर्णय झाला असून कोल्हापूर येथील साप्ताहिक करवीर काशीचे संपादक, लेखक, व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. सुनीलकुमार सरनाईक यांना हा पुरस्कार ९ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या साहित्य संमेलनात प्रदान करण्यात येणार आहे अशी माहिती शब्दगंध चे संस्थापक सचिव सुनील गोसावी व राज्य संघटक प्रा. डॉ.अशोक कानडे यांनी दिली.
शब्दगंध साहित्यिक परिषदेची बैठक अध्यक्ष राजेंद्र उदागे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच झाली असून या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
डॉ. सुनीलकुमार सरनाईक हे शिवाजी विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या व संवादशास्त्र विभागातून पीएचडी प्राप्त असून त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित आहेत. गेली ३० वर्षे करवीर काशी फाउंडेशनच्या माध्यमातून ते विविध सामाजिक उपक्रम राबवत असतात. ते महाराष्ट्र प्रदेश शासनमान्य जिल्हा वृत्तपत्र संपादक संघाचे सरचिटणीस असून खानदेश पत्रकार संघाचे प्रमुख सल्लागार आहेत. शब्दगंध साहित्यिक परिषदेचे ते कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी आहेत.त्यांनी प्रकाशित केलेल्या दिवाळी अंकास जवळपास १५ पुरस्कार मिळालेले आहेत.
यापूर्वी हा पुरस्कार इंजि.अर्शदभाई शेख, कॉ.आनंद वायकर,नगर,डॉ. शेषराव पठाडे, छत्रपती संभाजी नगर, कॉ. का. वा.शिरसाठ,पाथर्डी, कॉ.श्रीधर आदिक,श्रीरामपूर, कॉ.नारायण गायकवाड, पारनेर यांना देण्यात आलेला आहे.
माणसं मनातली, रोखठोक, ज्योतिबा: एक लोक दैवत, ग्राहकजागर, कृपावंत, स्मरणगाथा, महाराष्ट्राच्या पुरोगामी पाऊलखुणा ही त्यांची प्रकाशित पुस्तके असून त्यांनी ओंजळ, सन्मित्र, शब्दगंध, शब्दांगण, भरारी या पुस्तकांचे संपादन केले आहे. त्यांना आजवर केंद्र सरकारच्या स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्कार, ज्येष्ठ पत्रकार कै. ग.गो. राजाध्यक्ष पुरस्कार, ज्येष्ठ पत्रकार कै. बापुसाहेब दफ्तरदार पत्रकारिता पारीतोषिक व आचार्य बाळशास्त्री जांभेकर दर्पण पत्रकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ते पुरोगामी व प्रगतिशील विचारवंत म्हणून कार्यरत आहेत. म्हणून त्यांना कॉ. गोविंदभाई पानसरे स्मृती प्रबोधन पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.
डॉ.सरनाईक यांचे ज्ञानदेव पांडूळे, माजी प्राचार्य डॉ.जी.पी ढाकणे, अध्यक्ष राजेंद्र उदागे ,भगवान राऊत, शिरीष जाधव, बबन गिरी, डॉ तुकाराम गोंदकर, डॉ.अनिल गर्जे, सुभाष सोनवणे, ॲड.सुभाष लांडे पाटील, माजी प्राचार्य शिवाजीराव देवढे , राजेंद्र पवार, राजेंद्र चोभे पाटील यांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *