राहुरी वेब प्रतिनिधी दि.१,(शरद पाचारणे )-
राहुरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार प्राजक्त तनपुरे यांना राष्ट्रकुल संसदीय मंडळाने महाराष्ट्र शाखेतर्फे सन २०२३- २४ करिता महाराष्ट्र विधानसभा उत्कृष्ट भाषण पुरस्कार जाहीर झाला हा पुरस्कार वितरण सोहळा दिनांक 3 सप्टेंबर मंगळवारी विधान भवन मुंबई येथे राष्ट्रपती यांच्या हस्ते देण्यात येणार आहे. आमदार तनपुरे यांना हा पुरस्कार मिळाल्याने राहुरी विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी मतदार संघाला बहुमान प्राप्त झाले असल्याचे सांगत आनंद व्यक्त केला. आमदार तनपुरे हे राहुरी नगर परिषदेत प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून निवडून आले होते त्यानंतर त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली व प्रथमच आमदार झाले तसेच राज्यमंत्री मंडळातही राज्यमंत्री म्हणून प्रथमच संधी मिळाली तर अवघ्या चार वर्षाच्या कालावधीतच राष्ट्रकुल संसदीय मंडळांने पुरस्कार जाहीर केला . माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी सन 2000 साली उत्कृष्ट संसद पटू म्हणून पुरस्कार मिळविला होता त्यानंतर आता आमदार प्राजक्त तनपुरे यांना पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.
चौकट- आमदार प्राजक्त तनपुरे यांची प्रतिक्रिया.
राष्ट्रकुल संसदीय मंडळ, महाराष्ट्र शाखेच्या वतीने २०२३-२४ सालासाठी विधिमंडळातील सर्वोत्कृष्ट भाषणासाठी देण्यात येणाऱ्या ‘उत्कृष्ट भाषण’ पुरस्कारासाठी माझी निवड करण्यात आली. ही बातमी आपल्यासोबत शेअर करीत असताना मला अतिशय आनंद होत आहे.
राहुरी-नगर-पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील नागरीकांनी माझ्यावर विश्वास दाखवून मला विधानसभेत निवडून पाठविले. तो विश्वास सार्थ ठरविण्यासाठी मी सदैव कार्यरत आहे.
विधिमंडळात जनहिताचे मुद्दे मांडताना शेतकरी, कष्टकरी, कामगार, युवक, विद्यार्थी तसेच सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व आमचे प्रेरणास्थान खासदार शरदचंद्रजी पवार , प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, खासदार सुप्रिया सुळे यांचे आशीर्वाद व वेळोवेळी मिळणारे मार्गदर्शन तसेच माझ्या मतदारसंघातील जनता यांच्यामुळे हा पुरस्कार मिळाला आहे.
हा बहुमान मी माझ्या मतदारसंघातील जनता, आई-वडील तसेच वडीलधाऱ्या नेतृत्वाला कृतज्ञतापूर्वक समर्पित करतो. जनहिताचे काम करण्यासाठी मिळालेली ही उर्जा आपल्या सर्वांच्या साथीने अक्षय्य राहील हा विश्वास आहे.