राहुरी वेब प्रतिनिधी,२३ (शरद पाचारणे ): राहुरी पोलीस स्टेशन हद्दीतील सुवर्ण प्रगती हाउसिंग मायक्रो फायनान्स लिमिटेड, शाखा राहुरी येथील ग्राहकांकडून वसूल केलेली रक्कम संस्थेत न भरता परस्पर अपहार केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील तीन वर्षांपासून फरार असलेला आरोपी अखेर राहुरी पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे.
या प्रकरणी राहुरी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 335/2025 भारतीय दंड संहिता कलम 420 व 408 अन्वये गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यातील आरोपी अनिल बाळासाहेब पंडित (रा. निमगाव खैरी, ता. श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर) हा गुन्हा दाखल झाल्यापासून पसार होता.
आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वाखाली पोउपनि राजू जाधव, पोहेकॉ. राहुल यादव, पो.कॉ. गणेश लिपने यांचे विशेष पथक नेमण्यात आले. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली हे पथक रायगड जिल्ह्यात रवाना झाले. तांत्रिक विश्लेषण व माणगाव पोलिसांच्या मदतीने दोन दिवस अथक परिश्रम घेत आरोपी माणगाव पोलीस स्टेशन हद्दीत दडून बसल्याचे निष्पन्न झाले.
पथकाने सापळा रचून आरोपी अनिल पंडित याला शिताफीने ताब्यात घेत अटक केली. त्याला राहुरी येथे आणून मा. न्यायालयात हजर करण्यात आले आहे.
ही कारवाई मा. सोमनाथ घार्गे (पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर), मा. सोमनाथ वाघचौरे (अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर), मा. जयदत्त भवर (उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपूर विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत राहुरी पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी तसेच श्रीरामपूर सायबर सेलचे पोहेकॉ. संतोष दरेकर व पोहेकॉ. सचिन धनाड यांचे मोलाचे सहकार्य लाभले.