महिला बालकल्याण सभापतीपदी सौ.स्मिता भारत भुजाडी यांची बिनविरोध निवड

राहुरी वेब प्रतिनिधी ( शरद पाचारणे):
राहुरी नगरपालिकेच्या स्थायी समिती व विषय समित्यांच्या निवडणुका आज बिनविरोध पार पडल्या. महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी सौ.स्मिता भारत भुजाडी, तर शिक्षण समितीच्या सभापतीपदी उपनगराध्यक्ष गजानन भागवत सातभाई यांची निवड करण्यात आली. स्थायी समितीवर सत्ताधारी विकास आघाडीचे सात व विरोधी भाजपचा एक सदस्य एकमताने निवडून आल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार डॉ. अमीत पवार यांनी केली.
पालिकेच्या सभागृहात आज सकाळी नगराध्यक्ष भाऊसाहेब पवार यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्याधिकारी अभिजित हराळ यांच्या उपस्थितीत ही सभा झाली. यावेळी विषय समित्यांच्या तसेच स्थायी समितीच्या निवडी घेण्यात आल्या.
महिला व बालकल्याण समिती
महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी सौ. स्मिता भारत भुजाडी यांची निवड झाली. सदस्य म्हणून वृषाली नंदकुमार तनपुरे, संगीता शहाजी जाधव, आस्मा अरिफ शेख, प्रियांका अमोल काशीद, मनीषा सचिन भोंगळ यांची निवड करण्यात आली. या समितीवर सत्ताधारी विकास आघाडीचे चार व विरोधी भाजपच्या दोन सदस्यांची वर्णी लागली.
शिक्षण समिती
शिक्षण समितीचे पदसिद्ध सभापती म्हणून उपनगराध्यक्ष गजानन सातभाई यांची निवड झाली. सदस्य म्हणून केतन दशरथ पोपळघट, प्रतीक रावसाहेब तनपुरे, बबन कोंडीराम गुलदगड व विरोधी गटाकडून प्रसन्ना राजेंद्र वराळे यांची निवड करण्यात आली.
स्थायी समिती
स्थायी समितीवर पदसिद्ध सदस्य म्हणून नगराध्यक्ष भाऊसाहेब पवार, उपनगराध्यक्ष गजानन सातभाई व महिला बालकल्याण समितीच्या सभापती स्मिता भुजाडी यांचा समावेश आहे. इतर सदस्यांमध्ये गटनेते हर्ष अरुण तनपुरे, सोन्याबापू वसंतराव जगधने, प्रदीप नानासाहेब भुजाडी, सिंधू सुभाष डावखर यांची निवड झाली. या समितीवर सत्ताधारी गटाचे सहा व विरोधी गटाचा एक सदस्य आहे.
नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत माजी मंत्री प्राजक्त तनपुरे, सभापती अरुण तनपुरे व विकास मंडळाचे अध्यक्ष रावसाहेब चाचा तनपुरे यांच्या नेतृत्वाखालील विकास आघाडीचे १८ नगरसेवक निवडून आले आहेत. भाजपकडून जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील व युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डीले यांच्या नेतृत्वाखाली सात सदस्य निवडून आले आहेत.
नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे माजी खासदार प्रसाद तनपुरे, माजी नगराध्यक्षा डॉ. उषाताई तनपुरे, माजी मंत्री प्राजक्त तनपुरे, सभापती अरुण तनपुरे व विकास मंडळाचे अध्यक्ष रावसाहेब चाचा तनपुरे यांनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *