गुहा येथील अपघात प्रकरणात एसटी बस चालकाची निर्दोष मुक्तता

राहुरी वेब प्रतिनिधी,२७ ( शरद पाचारणे ):- गुहा फाटा येथे २०१६ मध्ये झालेल्या एसटी बस आणि विद्यार्थिनीच्या अपघाताप्रकरणी राहुरी येथील न्यायालयाने एसटी बस चालक इम्रान रशीद खान पठाण यांची नुकतीच निर्दोष मुक्तता केली आहे. सबळ पुराव्याअभावी न्यायालयाने हा निर्णय दिला, ज्याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले होते.

या प्रकरणी सविस्तर माहिती अशी की, १४ मार्च २०१६ रोजी सकाळी अंदाजे ७.३० वाजता फिर्यादीची मुलगी गुहा पाट, चिंचोली येथून सायकलवर शाळेत जात होती. त्याचवेळी गुहा फाटा येथे नगर-मनमाड रस्त्यावर सकाळी आठ वाजता आरोपी (एसटी बस चालक) इम्रान रशीद खान पठाण यांनी त्यांच्या ताब्यातील एमएच १४ बीटी ३८३० या क्रमांकाची बस हयगईने, अविचाराने आणि रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत भरधाव वेगात चालवून फिर्यादीच्या मुलीला जोरदार धडक दिली. या अपघातात विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली, तसेच सायकलचेही नुकसान झाले होते.

या घटनेनंतर राहुरी पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंवि कलम २७९, ३३७, ३३८, ४२७ आणि मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल केला (गुन्हा नंबर १/१००/१६). पोलिसांनी घटनेचा तपास पूर्ण करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. हा खटला राहुरी येथील न्यायमूर्ती श्रीमती अनुपमा पारशेट्टी यांच्यासमोर चालला.

सरकारतर्फे साक्षी पुरावे सादर करण्यात आले, परंतु ते सबळ नसल्याचे न्यायालयाने नमूद केले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आणि सादर केलेल्या पुराव्यांची तपासणी केल्यानंतर, न्यायालयाने आरोपी इम्रान रशीद खान पठाण यांची २४ जून २०२५ रोजी निर्दोष मुक्तता केली. आरोपींच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ आणि नोटरी पब्लिक ॲड. प्रकाश संसारे यांनी बाजू मांडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *