राहुरी वेब प्रतिनधी ,(शरद पाचारणे ) :- आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ विरोधी दिनाचे औचित्य साधून, राहुरी पोलीस स्टेशन आणि गट शिक्षणाधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने राहुरी तालुक्यातील सुमारे २३० शाळांमध्ये विविध कार्यक्रमांद्वारे अमली पदार्थांविरोधात जनजागृती करण्यात आली. यामध्ये निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, प्रभात फेरी आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचा समावेश होता.
दिनांक २५ जून आणि २६ जून २०२५ रोजी तालुक्यातील शाळांमध्ये अमली पदार्थांविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने निबंध स्पर्धा आणि चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. निबंध स्पर्धेसाठी ‘व्यसन आरोग्याचा शत्रू’, ‘माझे स्वप्न व्यसनमुक्त भारत’, ‘व्यसनमुक्त बालपण’, ‘व्यसनमुक्त युवक सशक्त राष्ट्राची गरज’ आणि ‘अमली पदार्थांची जाळे युवकांसाठी एक धोका’ हे विषय होते. तर चित्रकला स्पर्धेसाठी ‘व्यसनांना नकार आरोग्याला होकार’, ‘नशामुक्त भारत’ आणि ‘व्यसन नको शिक्षण हवे’ हे विषय ठेवण्यात आले होते.
या दोन्ही स्पर्धांमधून इयत्ता पाचवी ते सातवी आणि आठवी ते दहावी अशा दोन गटातून प्रत्येकी पहिले तीन क्रमांक काढण्यात येणार आहेत. या विजेत्यांचा गौरव स्वातंत्र्यदिनी तालुक्याच्या मुख्य ध्वजारोहण कार्यक्रमावेळी करण्यात येणार आहे. या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी तालुक्यातील २३० शाळांनी सहभाग नोंदवला. तसेच तालुक्यातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, पोलीस स्टेशनकडील अधिकारी, अंमलदार आणि तालुक्यातील सर्व पोलीस पाटील यांनी या उपक्रमासाठी समन्वय साधला.
दिनांक २६ जून २०२५ रोजी शालेय विद्यार्थ्यांमध्ये अमली पदार्थ विरोधी जनजागृती करण्याच्या दृष्टीने राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. संजय ठेंगे यांनी गटशिक्षणाधिकारी श्री. मोहिनीराज तुंबारे यांच्या समन्वयातून वाणी स्कूल, गणेगाव येथून व्हर्च्युअल मीटिंगद्वारे राहुरी तालुक्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांपर्यंत जनजागृती केली. या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये तालुक्यातील ९३ शाळांमधील सुमारे १३,२३० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
सदर अमली पदार्थ विरोधी जनजागृती कार्यक्रम अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ घारगे साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. वैभव कलुबर्मे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. बसवराज शिवपुजे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, गटशिक्षणाधिकारी श्री. मोहिनीराज तुंबारे साहेब, श्री. गुलदगड (पंचायत समिती राहुरी), श्री. शिरसाठ (सहाय्यक पोलीस निरीक्षक, राहुरी), पोलीस उपनिरीक्षक समाधान फडोळ, संदीप मुरकुटे, चारुदत्त खोडे, गणेश वाघमारे, पोलीस अंमलदार अशोक शिंदे , संजय राठोड, गणेश सानप, अमित राठोड, प्रवीण बागुल, सतीश आवारे, रामनाथ सानप, तुळशीदास गीते, संदीप ठाणगे, तालुक्यातील सर्व मुख्याध्यापक तथा शिक्षकवृंद आणि तालुक्यातील सर्व पोलीस पाटील सदाशिव तागड, दादासाहेब पवार, हिराबाई नरोडे, अर्चना शिंगोटे, संतोष शिंदे, पाटोळे यांच्या समन्वयातून यशस्वीपणे पार पडला.
या व्हर्च्युअल मीटिंग कार्यक्रमासाठी श्री. दत्तात्रय वाणी (संचालक, बाळासाहेब वाणी स्कूल, गणेगाव), शिक्षकेतर कर्मचारी, श्री. मोहनीराज तुंबारे साहेब (शिक्षणाधिकारी, पंचायत समिती राहुरी) तसेच अरुण तूपविहारे (मुख्याध्यापक, सावित्रीबाई फुले विद्यालय, राहुरी कृषी विद्यापीठ) यांचे विशेष सहकार्य लाभले.