डॉ.तनपुरे कारखान्याचे नूतन चेअरमन अरुण तनपुरे अजित पवार गटात सामील; तालुक्याच्या राजकारणात मोठी खळबळ

राहुरी प्रतिनिधी,२५ (शरद पाचारणे)

राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तसेच डॉ. बाबुराब बापुजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे नवनियुक्त चेअरमन अरुण तनपुरे आणि त्यांचे पुत्र व कारखान्याचे संचालक हर्ष तनपुरे यांनी मंगळवार २४ जून रोजी रात्री ८.३० वाजता देवगिरी बंगल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षात अधिकृतपणे प्रवेश केला. गेल्या काही दिवसांपासून अरुण तनपुरे अजित पवार गटात सामील होणार असल्याची चर्चा होती, ज्याला आज मुहूर्त मिळाला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अशोक सावंत आणि राहुरी शहराध्यक्ष सुनील भट्टड यांच्या यशस्वी मध्यस्थीने हा प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबतच प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, आमदार शिवाजीराव गर्जे, आमदार काशिनाथ दाते, जिल्हाध्यक्ष अशोक सावंत, राहुरी शहराध्यक्ष सुनील भट्टड, युवक शहराध्यक्ष निलेश शिरसाठ, अनिल सुराणा आदी प्रमुख नेते उपस्थित होते.

या पक्षप्रवेशाबद्दल बोलताना जिल्हाध्यक्ष अशोक सावंत यांनी सांगितले की, “गेल्या अनेक दिवसांपासून प्रवेशाबाबत चर्चा आणि बैठका सुरू होत्या. मात्र आज अखेर अजित दादांच्या उपस्थितीत प्रवेश पार पडल्याने निश्चितच पक्षाची ताकद वाढणार आहे.”

राहुरी शहराध्यक्ष सुनील भट्टड यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, “तनपुरे साखर कारखाना अरुणसाहेब तनपुरे यांच्या ताब्यात आल्याने सभासदांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. आज अजित पवार गटात अरुण तनपुरे आणि हर्ष तनपुरे यांनी प्रवेश केल्यामुळे निश्चितच कारखाना सुरू करण्यासाठी अजित पवार मदत करतील आणि हा कारखाना सुरू होईल.”

दरम्यान, येत्या आठवड्यात अरुण तनपुरे यांना मानणारे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते यांचाही मोठा पक्षप्रवेश सोहळा होणार असल्याचे समजते. माजीमंत्री प्राजक्त तनपुरे यांचे चुलते अरुण तनपुरे यांनी अजित दादा गटात प्रवेश केल्यामुळे आता प्राजक्त तनपुरे काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *